नाशिक (प्रतिनिधी): कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आर्थिक सहायत्ता योजनेंतर्गत सवलतीच्या दराने मे महिन्यासाठी रेशन दुकानांमध्ये धान्य पुरवठा झाला आहे. महागरपालिका क्षेत्रातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटूंब पात्र लाभार्थ्यांना रेशन दुकानातून हे धान्य घेता येईल.
सवलतीच्या दराने अन्नध्यान्य मिळण्यास पात्र असलेल्या लाभार्थ्यांना मे २०२१ या एका महिन्यासाठी प्रति कार्ड ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति व्यक्ती एकूण ५ किलो गहू व तांदूळ मोफत मिळणार आहेत. याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना-३ अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम पात्र लाभार्थ्यांना मे व जून २०२१ या कालावधीत प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो या प्रमाणे व मे महिन्यासाठी प्रति कार्ड १ किलो चणाडाळ मोफत मिळणार आहे. दुकानातून हे धान्य घेऊन त्याची नियमित पावती प्राप्त करून घ्यावी. यासाठी कोणतीही रक्कम अदा करू नये. याबाबत काही तक्रार असल्यास शासनाने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे यांनी केले आहे.