नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर भावनेच्या भरात मृत व्यक्तीची हाताळणी आणि अंत्यविधीप्रसंगी कुटुंबातील व्यक्तींकडून केल्या जात असलेल्या विधींमुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. आणि अनेकदा यामुळे अख्खे कुटुंबच बाधित होत आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे यापुढे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना साधारण एक मीटर अंतर राखूनच अंत्यदर्शन घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
मृतदेहाला आंघोळ घालणे, मिठी मारणे वा पाणी पाजणे या सर्व बाबींना शासनाने मज्जाव केला आहे. राज्य सरकारच्या गृहविभागाने याबाबत नव्याने आदेश जरी करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या आहेत.
मृत पावलेल्या व्यक्तीच्या प्रेमापोटी अनेकदा भावना अनावर होऊन काही गोष्टी कळत नकळत घडतात. मृत व्यक्तीच्या संपर्कात येण्याचे प्रमाणसुद्धा वाढू लागले. त्यामुळे ही मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे मृतदेहाची वाहतूक करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांसाठी सुद्धा नियमावली ठरविण्यात आली आहे. मृतदेह बांधण्यासाठी नातेवाईकांची मदत घेता येणार नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा आदर ठेवून त्यांना ताबा देण्यात यावा मात्र एक मीटर अंतरावरूनच अंत्यदर्शन देण्यात यावे.