नाशिक (प्रतिनिधी): लॉकडाऊनमध्ये लग्नसमारंभ २५ लोकांच्या उपस्थितीत आणि दोन तासांच्या कालावधीत पार पाडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचा फायदा घेत सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह पार पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नवरा मुलगा व त्याचे कुटुंब आणि अल्पवयीन मुलगी व तिच्या कुटुंबियांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाइल्ड वेल्फेअरच्या महिला अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, चांदवड येथील सोळा वर्षीय मुलीचा साखरपुडा १३ एप्रिलला सातपूरच्या एका तरुणासोबत होणार असल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन वधू व वराच्या आईवडिलांना समज दिली होती. मात्र, तरीही सातपूरच्या श्रमिकनगरातील घरात हा विवाहसोहळा पार पडला. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. या तक्रारीनुसार राजेंद्र बाळू कुऱ्हाडे, बायजाबाई कुऱ्हाडे, अविनाश प्रभाकर काळे, प्रभाकर काळे, उषाबाई काळे आणि त्यांच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. कोरोना नियमांचे उल्लंघनही झाले.