नाशिक (प्रतिनिधी): नॅचरोपॅथी उपचार पद्धतीमधील जलनेती आणि सूर्यस्नान क्रिया कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचा प्रत्यय पोलिस कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांना आला आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सूर्यस्नान आणि जलनेती या दोन प्रक्रियांचा अवलंब सुरू केल्याने ९० रुग्ण ऑक्सिजन न लागता बरे झाले आहेत.
कोरोनाबाधितांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष विभागाने आयुर्वेद उपचार पद्धती प्रभावी असल्याचे सांगितले आहे. या उपचार पद्धतीत नियमितता असल्यास कोरोना बरा होईल, तसेच कोरोनाची बाधा हाेणार नाही अशी प्रभावशाली उपचार पद्धती म्हणजे जलनेती आणि सूर्यस्नान असल्याचा अनुभव खुद्द पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. या दोन्ही उपचार पद्धती ऑर्थर रोड कारागृहात त्यांनी राबवल्या होत्या. आता ही उपचार पद्धती पोलिस कोविड सेंटरमध्ये अवलंबली जात असल्याने याचा फायदा बाधित रुग्णांना होत आहे.
कोवळ्या उन्हात सूर्यस्नान घ्यावे
सूर्यस्नान आणि जलनेती ही क्रिया नॅचरोपॅथीमध्ये केली जाते. यास आयुष विभागानेही काेराेनावर मात करण्यासाठी परवानगी दिली आहे. नागरिकांनी या उपचार पद्धती सुरू करावी. सूर्यस्नान घेताना अधिक तीव्र तापमानात घेऊ नये. सकाळी ८ पर्यंत आणि सायंकाळी ५ नंतर हे स्नान घ्यावे याचा फायदा अधिक होतो. – दीपक पांडेय, पोलिस आयुक्त
सूर्यस्नान घेताना सकाळी ८ च्या पूर्वी आणि सायंकाळी ५ नंतर कमीत कमी कपड्यात घ्यावे. या मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते. तसेच जलनेती दिवसातून दोन वेळा करावी. यासाठी कोमट पाणी, सेंदव मीठ आणि जलपात्र आवश्यक आहे. या मुळे श्वास मोकळा होतो. नाकाच्या छिद्रात असलेले विषाणू बाहेर पडण्यास मदत होते. मात्र ही क्रिया केल्यानंतर कपालभाती प्राणायाम करून नाकातील पाणी बाहेर काढावे.