कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नाशिक शहरातील या भागातही ११ दिवस जनता कर्फ्यू लावण्याचे ठरले आहे..
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग एकमध्ये ११ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक संघटना, सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रतिष्ठान परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यांची सोमवारी (दि. १९) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २० ते ३० एप्रिलपर्यंत हा प्रभाग पूर्ण लॉकडाऊन राहणार आहे.
प्रभाग एकमधील म्हसरूळ, दिंडोरी रोड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक संस्थाकडून हा निर्णय घेण्यात आला. या काळात किराणा दुकान, गिरणी, भाजीपाला व दूध व्यवसाय सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू राहणार आहे. बैठकीत स्थायी सभापती गणेश गीते,माजी महापौर रंजना भानसी, नगरसेवक अरुण पवार, शिवसेनेचे विशाल कदम, बाळासाहेब राऊत, सुनील निरगुडे, संजना पगार, योगेश मोरे, सचिन पवार, सचिन देवरे, भालचंद्र पवार, राजू थोरात, हर्षल पवार, भाऊसाहेब नेहरे, स्नेहल ठाकरे आदीं उपस्थित होते.
संस्थांतर्फे अन्न पुरवठा
कोविड सेंटरमधील रुग्णांना बाबा ट्रेडर्सचे संचालक योगेश मोरे व आई प्रतिष्ठानच्या संजना पगार जेवण देणार आहेत. आरोग्य सेवा पंचवटी मेडिकल असोसिएशन व परिसरातील सर्व डॉक्टर पुरवतील असे डॉ. सचिन देवरेंनी सांगितले.
मनपा शाळेत कोविड सेंटर
प्रभागातील नागरिकांसाठी मनपा शाळा क्रमांक ८९ व विद्यानिकेतन क्र. ९ मध्ये कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे. लक्षण असल्यास कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे. -गणेश गीते, स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक प्रभाग १