नाशिक (प्रतिनिधी) : आज गुरुवारी (दि. 23 एप्रिल 2020) सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना साथरोग बाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त झाला असून त्यात आजपर्यंत जिल्ह्यातील ७०५ संसर्गितांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १२४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज अखेर २०५ संशयितांचे अहवाल प्रलंबित असून जिल्ह्यातून दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले असून ९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १० रुग्ण कोरोना संक्रमित असून त्यातील १ रुग्ण पूर्णपणे बरा होऊन कोरोना मुक्त झाला आहे. नाशिक ग्रामीण भागातून ४ रुग्ण कोरोना बाधित असून त्यातील एक रुग्ण पूर्णतः बरं होऊन कोरोना मुक्त झाला आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ११० कोरोना संक्रमित असून त्यातील ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १२४ कोरोना बाधित रुग्ण आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांनी आजपर्यंत जिल्हा प्रशासनास चांगले सहकार्य केले असून जनतेच्या या सहकार्याच्या बळावर प्रशासन कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करीत आहे. येणाऱ्या रमजानच्या पर्वातही लोकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
(टीप: सदरची आकडेवारीही गुरुवारी (दि. 23 एप्रिल 2020) सायंकाळी सात वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक यांच्या कडून प्राप्त अहवालानुसार आहे.)