नाशिक (प्रतिनिधी): वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या तुलनेत व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड पुरवण्यासाठी पालिका आयुक्त कैलास जाधव यांची धडपड सुरूच असून शनिवारी शहरातील खासगी आणि पालिका रुग्णालयांमध्ये ५०५ ऑक्सिजन बेड वाढविल्यानंतर सोमवारी पुन्हा १३५ व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे तीन दिवसात नव्याने ६३९ बेड उपलब्ध झाले आहे.
शहरात अघ्या एक महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात तब्बल तीस हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जवळपास १३ ते १४ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत आहे. सद्यस्थितीत शहरात खासगी व पालिकेचे मिळून १२८३ ऑक्सिजन बेड आहेत, तर ५३७ आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. गेल्या शनिवारी यात ५०४ बेडची भर घातली होती.
मात्र, येत्या काळात बेडची मागणी पुन्हा वाढणार असल्याने बिटकोसह खासगी रुग्णालये मिळून जवळपास १३५ ऑक्सिजन बेड वाढविले आहेत. तर दोन दिवसांत बिटकोत आणखी १०० ऑक्सिजन बेड कार्यान्वित होणार आहेत.
शहरात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत असून साधारण एक हजार ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या आठवड्यात ५०४ बेड वाढविले होते. त्यात सोमवारी आणखीन १३५ बेड वाढले असून दोन दिवसांत १०० बेड वाढणार आहेत. – कैलास जाधव, आयुक्त, मनपा