नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर व परिसरात असणाऱ्या व्यवसायिकांची व विक्रेत्यांची कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर चाचणी करण्यासाठी ३० पथकांची नेमणूक केली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने विविध पातळ्यांवर मनपा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे.नाशिक शहरात विविध किराणा दुकानदार, फळविक्रेते, भाजी विक्रेते, औषध विक्रेते,हातगाडीवरील विक्रेते, सलून चालक ईत्यादी, यांचा विविध लोकांशी संपर्क येत असल्याने व त्यांच्या संपर्कामुळे देखील कोविड -१९ कोरोना चा प्रादुर्भाव वाढू शकतो.
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व विक्रेत्यांची कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर चाचणी करून घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मनपा सार्वजनिक आरोग्य विभागा च्यावतीने सर्व विक्रेत्यांची कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर तपासणी करणेकामी ३० पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या मार्फत सर्व विक्रेत्यांची कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर तपासणी करण्याबाबतचे निर्देश आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेले आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांनी आलेल्या आरोग्य पथकास सहकार्य करून स्वतःची कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर चाचणी करून घ्यावी असे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.
नाशिक महानगरपालिका अंतर्गत कार्यरत सर्व कार्यालये, विभागीय कार्यालये तसेच रुग्णालय इत्यादी ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी, शहरातील सर्व सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक इत्यादींचा सतत बाहेरील नागरिकांशी संपर्क येत असतो. तरी हे अधिकारी कर्मचारी हे कोविड-१९ कोरोना बाधित झाल्यास ते सुपर स्प्रेडर(super spreaders)होऊ शकतात व त्यांच्या संपर्कामुळे देखील कोविड-१९ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर चाचणी करण्याबाबत आयुक्त कैलास जाधव यांनी निर्देश दिले असून त्या आदेशान्वये या चाचण्या घेण्यासाठी पथकांची नेमणूक केली असून या तपासण्या सुरू करण्यात आलेल्या असल्याची माहिती आरोग्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.