नाशिक (प्रातिनिधी): महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लेखी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्या शाखांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा १९ एप्रिलपासून पुढे घेण्यात येणार आहे. याबाबत सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील परीक्षार्थींचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षासंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परीक्षा संदर्भातील अद्ययावत माहितीसाठी आरोग्य विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे त्यांनी सांगितले.