नाशिक (प्रतिनिधी): जिल्हाधिकारी कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयाची पुण्याच्या मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक (आयजीआर) कार्यालयाकडे नेण्यात येणारी अत्यंत महत्त्वाची संशयास्पद, वादग्रस्त कागदपत्रे कारच्या काचा फोडून पळविल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात संशयित, निलंबित लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आयजीआर कार्यालयाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर आता सरकारवाडा पोलिसांनी शुक्रवारी दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. दरम्यान, निलंबित कर्मचाऱ्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथकेही रवाना झाली आहे.
देवळा तालुक्यातील बनावट मुद्रांकावर खोटे दस्त करून खरेदी-विक्रीचा प्रकार ताजा असतानाच दुय्यम निबंधक कार्यालयातील वादग्रस्त, संवेदनशील कागदपत्रे पुण्याला नेत असताना गाडीच्या काचा फोडून ती पळविण्यात आल्याचा प्रकार घडला होता. जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्यांच्या मालमत्तेशी संबंधित ही कागदपत्रे आहेत. त्यात फेरफार झाल्याच्या तक्ररीवरुन पुण्यातील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने तपासणीसाठी दस्तांची मागणी केली होती. ही महत्त्वपूर्ण कागदपत्रे पुण्याकडे लिपिकामार्फत नेली जात असताना नारायणगावजवळ गाडीच्या काचा फोडून ती पळविण्यात आली. त्यावर आयजीआर कार्यालयाच्या पथकाने सोमवारपासून नाशिकमध्ये ठाण मांडत दुय्यम निबंधक कार्यालयासह मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचाही कसून तपासणी केली. त्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात संबंधित लिपिकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे