नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांना कुठे तरी कोरोनाचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे नागरिक सर्रास नियमांचे उल्लंघन करतात. म्हणून, विषाणूच्या संसर्गाने आरोग्याच्या बाबतीत अपायकारक परिस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी असा अतिउत्साही नागरिकांना आवर घालण्यासाठी व कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ अंतर्गत शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. दरम्यान, (दि.२३ डिसेंबर) पासून ते (दि.५ जानेवारी) पर्यंत दररोज रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू असेन.
संचारबंदी अंतर्गत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून, विनाकारण घराबाहेर पडून, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये असे आवाहन पांडे यांनी केले आहे. तर, आदेशाचे उल्लंघन झाल्यास, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तर, सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत रात्रपाळीवर असलेल्या कामगारांना रात्री १२ नंतर घरी जावे लागते. यामुळे या कामगारांची संबंधित परिसरात वर्दळ असते. तर या कामगारांची संचारबंदी दरम्यान गैरसोय होऊ नये म्हणून, कामगारांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे. असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, काही कामगारांकडे ओळ्खपत्रच नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे कंपनीकडे ओळखपत्र उपलब्ध करून मिळावेत म्हणून, कामगारांनी मागणी केली असता, त्यांची मागणी काही कंपन्यांनी अद्याप पूर्ण केली नाही. त्यामुळे कामगारांची गैरसोय होऊ शकते.