नाशिक (प्रतिनिधी): शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमी या प्रशिक्षण केंद्रामध्ये गेल्या आठ दिवसात जवळपास १६७ प्रशिक्षणार्थींना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग हादरला आहे. त्याचप्रमाणे या १६७ जणांच्या संपर्कात आलेल्यांचीसुद्धा तपासणी सुरु करण्यात आली आहे.
या अकॅडमी मध्ये मागील आठवड्यामध्ये काही बाधित मिळाले होते. त्यानंतर बाधितांची संख्या वाढली. कोरोना झालेल्या काही बाधितांवर ठक्कर डोम येथे उपचार सुरु आहेत तर काहींना मविप्र रुग्णालय आडगाव येथे दाखल करण्यात आले आहे. बाकी जे प्रशिक्षणार्थी कोरोना निगेटिव्ह आले आहेत त्यांची सध्या प्रशिक्षण थांबवून त्यांना अकॅडमी मध्येच क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अकादमीमधल्या ६०० जणांचीसुद्धा तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.