नाशिक (प्रतिनिधी) : २६ जानेवारीपासून महापालिकेअंतर्गत टप्प्याटप्प्याने नियमित शहर बससेवा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, शहर बसेसचे भाडे हे ४ किलोमीटरला ५ रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेच्या तुलनेत भाडे हे निम्मे आहे. असा दावा देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा परवडत नसल्याचे कारण पुढे केले होते. त्यामुळे महापालिकेनेच शहर बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेऊन, ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ तत्वानुसार,पहिल्या टप्प्यात अडीचशे बसेस सुरु करण्याचे जाहीर केले. दरम्यान, शहर बससेवेसाठी महापालिकेचे इन्फास्ट्रक्चर असणार आहे तर, बस पुरवणाऱ्या ठेकेदार कंपन्यांची नियुक्ती, ऑपरेटर, चालक व वाहकांची नियुक्ती हे सर्व महापालिका करणार आहे. १०० सीएनजी, १०० डिझेल, तर ५० इलेकट्रीक बस चालवण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून सध्या ४ किलोमीटरला १० रुपये असा दर आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर बससेवेचे दर ४ किलोमीटरला ५ रुपये असणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत शहर बससेवेसाठीच्या पायाभूत सुविधा, नियंत्रक, शासनाकडून तिकिटाचे दर निश्चित करणे, परमिट, बस डेपो इत्यादींची पूर्तता करण्यात येणार आहे.