नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये लहान मोठ्या धरून ८० विषयांवर चर्चा झाली. सभेमध्ये आदिवासी भागातील अंगणवाड्यांमधील मुलांच्या पोषण व आरोग्यासाठी ६ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले.
आदिवासी भागातील मुलांचे कुपोषण टाळण्यासाठी गुळ व शेंगदाणे तसेच त्यांच्या आरोग्यासाठी लागणारी औषधे किंवा या दृष्टीने अजुन काही उपाययोजना करता याव्या यासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे. याच मुद्द्यासोबत कृषी व शिक्षण विभागाचे सौरऊर्जा प्रकल्प, नवीन प्रशासकीय इमारत, कोविडसाठी औषधे यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
ही सभा जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. नाशिक जिल्ह्याला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.