नाशिक (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीमध्ये पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात बघायला मिळत आहेत. या आंदोलनाला विविध संघटना पाठिंबा देत असून, याच पार्श्वभूमीवर आज (दि.८) तारखेला भारत बंद ची हाक त्यांनी दिली आहे. यामुळेच जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
पोलिस आयुक्तालयासोबतच पोलिस अधीक्षक कार्यालयाने देखील राज्य राखीव दलाच्या एका कंपनीचा अतिरिक्त बंदोबस्त मागितला आहे. एसआरपीच्या जवानांना महामार्गांवर, बाजार समित्यांमध्ये तैनात केले आहे.
महामार्गावरील गर्दीच्या ठिकाणी चौकांसह ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहे. रहदारीला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण केल्यास त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. स्वयंस्फूर्तीने जर कोणाला आपला व्यवसाय बंद ठेवायचा असेल तर हरकत नाही; परंतु, कोणी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.