नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यातील शहा येथे २८ वर्षीय तरुण मागील ३ दिवसांपासून बेपत्ता होता. त्यानंतर रविवारी (दि.२९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहा-पांचाळे रस्त्यालगत असलेल्या खाणीमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नितीन अरुण गुंजाळ असे मयताचे नाव आहे. सिन्नारमधल्या एका खाजगी कंपनीत नितीन कामाला होता. दिवाळीच्या सुट्टीनंतर नितीनच्या आई, वडील आणि भावाने त्याला पुन्हा कामावर जाण्यास सांगितले. जेवण करून घराबाहेर निघालेला नितीन अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर शहा-पांचाळे रस्त्याच्या लागत असलेल्या पाण्याच्या खाणीत अनोळखी मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून घेतली. ४ फुट खोल असलेल्या पाण्यात जीव कसा जाईल असा प्रश्न उपस्थित झाला असून या सगळ्या घटनेमध्ये नितीनच्या कुटुंबाला घातपात झाल्याचा संशय आहे.
कारण, दिवाळीच्या आधी नितीन घरी येत असतांना काही अज्ञात तरुणांनी नितीनचा रस्ता अडवला होता. त्यावेळी त्याला मारहाण पण करण्यात आली होती. अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पुढील तपास सुरु आहे.