🌞 आजचे तापमान- किमान: 14.8°C । कमाल: 32.9 °C

नाशिक: सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या; ७० हजारांच्या बदल्यात भरले तीन लाखांचे व्याज

नाशिक। दि. २७ नोव्हेंबर २०२६ : गरजेपोटी घेतलेल्या ७० हजार रुपयांच्या कर्जापोटी तब्बल तीन लाख रुपये व्याज म्हणून परत केले, तरीही सावकारांकडून पैशांचा तगादा आणि धमक्यांचे सत्र सुरूच होते. या कथित मानसिक छळाला कंटाळून एका ३५ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मखमलाबाद परिसरातील जुईनगर येथे घडली. कैलास शिंदे असे मृत युवकाचे नाव आहे.

या प्रकरणी मृत कैलास यांच्या पत्नी योगिता शिंदे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नवापूर तालुक्यातील संदीप मुकेश पाटील आणि सुलोचना पाटील या मायलेकांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमधील ई-बाईक टॅक्सी सेवा अवैध; नागरिकांनी प्रवास टाळावा- आरटीओचे आवाहन

७० हजारांच्या कर्जापोटी तीन लाखांची परतफेड:
तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये कैलास शिंदे यांनी संदीप पाटील आणि सुलोचना पाटील यांच्याकडून हातउसने ७० हजार रुपये घेतले होते. या रकमेच्या बदल्यात त्यांनी आतापर्यंत व्याजापोटी सुमारे तीन लाख रुपये परत केले होते. मात्र, एवढी मोठी रक्कम अदा करूनही संशयितांकडून पैशांची मागणी थांबली नव्हती.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानाचा वापर; गर्दी, वाहतूक व्यवस्थापनाला मिळणार बळ

शहर बदलले, तरी छळ थांबेना:
तक्रारीनुसार, संशयितांकडून कैलास यांना प्रत्यक्ष भेटून शिवीगाळ केली जात होती, तसेच फोनवरून धमकावले जात होते. पैसे न दिल्यास बघून घेण्याची धमकीही दिली जात होती. या सततच्या त्रासामुळे कैलास आणि त्यांच्या पत्नीने नवापूर सोडून नाशिकमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिकमध्ये आल्यानंतरही कथित पैशांचा तगादा आणि धमक्यांचे प्रकार सुरूच राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर विशेष कारवाई मोहीम

अखेर या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून कैलास यांनी जुईनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, म्हसरूळ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. (म्हसरूळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४६४/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790