🌞 आजचे तापमान- किमान: 14.8°C । कमाल: 32.3 °C

नाशिक: मॉडिफाईड सायलेंसर लावणाऱ्या ४२ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

नाशिक। दि. २६ नोव्हेंबर २०२६: दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये कंपनीने दिलेले मूळ सायलेंसर काढून त्याऐवजी फटाक्यांसारखा मोठा आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसविणाऱ्या वाहनचालकांविरोधात नाशिक शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत शहरातील एकूण ४२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी आणि ‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम राबविण्यात आली. यावेळी नियमांचे उल्लंघन करून मूळ सायलेंसरमध्ये बदल करणाऱ्या तसेच फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर वापरणाऱ्या वाहनचालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रांवर २८ नोव्हेंबर रोजी नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी

या विशेष मोहिमेदरम्यान परिमंडळ-१ अंतर्गत १२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी १० वाहनचालकांना प्रत्येकी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एकूण १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर दोन वाहनांचे मॉडिफाईड सायलेंसर काढून त्यांचा नष्ट करण्यात आले.

परिमंडळ-२ अंतर्गत १० वाहनचालकांवर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच शहर वाहतूक शाखेने २० वाहनचालकांवर कारवाई करत २० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमधील ई-बाईक टॅक्सी सेवा अवैध; नागरिकांनी प्रवास टाळावा- आरटीओचे आवाहन

अशा प्रकारे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ४२ वाहनचालकांवर कारवाई करून ४० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यापुढेही नियमितपणे वाहन तपासणी मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790