🌞 आजचे तापमान- किमान: 14.8°C । कमाल: 32.3 °C

नाशिकमधील ई-बाईक टॅक्सी सेवा अवैध; नागरिकांनी प्रवास टाळावा- आरटीओचे आवाहन

नाशिक। दि. २६ नोव्हेंबर २०२६: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नाशिक यांच्याकडून कोणत्याही समुच्चयक (अ‍ॅग्रीगेटर) कंपनीला ई-बाईक टॅक्सीद्वारे प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना देण्यात आलेला नाही. असे असतानाही काही कंपन्यांकडून मोबाईल ॲपद्वारे अवैधरित्या ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने नागरिकांनी ॲपआधारित ई-बाईक टॅक्सी सेवा अवैध असल्याने अशा सेवेद्वारे प्रवास करू नये व वाहनधारकांनी आपले वाहन ई-बाईक टॅक्सी सेवा देण्यासाठी कोणत्याही संस्था अथवा कंपनीसोबत करार करू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रांवर २८ नोव्हेंबर रोजी नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी

महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम २०२५ अंतर्गत आवश्यक परवाना नसतानाही दोन खाजगी कंपन्यांकडून ई-बाईक टॅक्सी सेवा पुरविली जात असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. या माध्यमातून शासनाची तसेच प्रवाशांची फसवणूक होत असून प्रवासी आणि इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आर्या ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या अंगठ्यांचा ट्रे लुटून फरार झालेल्या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक !

परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार अशा प्रकारे बेकायदेशीर ई-बाईक टॅक्सी सेवा चालविणाऱ्याया या कंपन्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संबंधित कंपन्यांना ई-बाईक टॅक्सी सेवा चालविण्याची परवानगी किंवा अनुज्ञप्ती देण्यात आलेली नसल्याने अशा वाहनांचे चालक तसेच सेवा पुरवठादार यांच्याविरुद्ध परिवहन विभाग आणि पोलीस विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790