नाशिक: आर्या ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या अंगठ्यांचा ट्रे लुटून फरार झालेल्या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक !

नाशिक। दि. २४ नोव्हेंबर २०२६: आडगाव परिसरातील आर्या ज्वेलर्स या सराफ दुकानातून सोन्याच्या अंगठ्यांचा ट्रे चोरून नेणाऱ्या टोळीतील दोन संशयितांना नाशिक गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची ह्युंदाई ऑरा कार आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी अज्ञात व्यक्तींनी सोन्याच्या अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने आडगाव येथील आर्या ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सोन्याच्या अंगठ्यांचा ट्रे घेऊन त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये थंडीचा जोर ओसरला; आज (दि. २४) किमान तापमानाचा पारा १६.७ अंशांवर

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाला आवश्यक मार्गदर्शन करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई ऑरा कारमधून आलेल्या व्यक्तींनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच संशयित आरोपी प्रयागराज परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वेदांत काळे हत्या प्रकरणातील फरार संशयिताला राहुडबारी घाटातून अटक

वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे रवाना झाले. तेथे सलग पाच दिवस शोधमोहीम राबवून पोलिसांनी संशयितांची ओळख आणि पत्ता निष्पन्न केला. त्यानंतर अंतीम कामताप्रसाद तिवारी (वय ३०, व्यवसाय वाहनचालक) आणि राहुल राजेंद्रप्रसाद सिंग (वय ३४, व्यवसाय कार मेकॅनिक) या दोघांना अटक करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  सार्वजनिक संगणकावर WhatsApp वापरताय? एक चूक अन् तुमची खासगी माहिती होऊ शकते चोरी !

पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांनी अन्य चार साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची ह्युंदाई ऑरा कार आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना नाशिक येथे आणल्यानंतर पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यातील अन्य चार साथीदारांचा सहभाग आणि त्यांचा शोध याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790