सार्वजनिक संगणकावर WhatsApp वापरताय? एक चूक अन् तुमची खासगी माहिती होऊ शकते चोरी !

नवी दिल्ली। दि. २४ नोव्हेंबर २०२६: सायबर कॅफे, कार्यालय किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणच्या संगणकावर WhatsApp Web वापरल्यानंतर लॉगआउट न करता बाहेर पडणे महागात पडू शकते. अशा वेळी तुमची वैयक्तिक संभाषणे, गोपनीय माहिती आणि संपर्क तपशील सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर तुमच्या WhatsApp खात्याचा गैरवापर करून परिचितांना संदेश पाठवणे आणि आर्थिक फसवणूक करणेही शक्य आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विवाहितेचा सासरी छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लॉगआउट न केल्यास खात्याचा गैरवापर शक्य:
सार्वजनिक संगणकावर WhatsApp Web सुरू केल्यानंतर खाते लॉग-इन अवस्थेत राहिल्यास दुसरी व्यक्ती तुमचे खासगी संदेश वाचू शकते. तसेच तुमच्या खात्याचा वापर करून इतरांना संदेश पाठवणे, वैयक्तिक माहिती मिळवणे किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून पैशांची मागणी करणे असे गैरप्रकार घडू शकतात.

ब्राउझर बंद करणे पुरेसे नाही!:
कार्यालयीन, आर्थिक, शासकीय अथवा अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण सार्वजनिक संगणकावर WhatsApp Web च्या माध्यमातून करणे टाळावे, असे आवाहन सायबर यंत्रणेकडून करण्यात आले आहे. अनेकजण काम झाल्यानंतर केवळ ब्राउझर बंद करतात. मात्र, त्यामुळे WhatsApp खाते सुरक्षितपणे लॉगआउट झालेच असे नाही. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर खात्यातून स्वतंत्रपणे लॉगआउट करणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये थंडीचा जोर ओसरला; आज (दि. २४) किमान तापमानाचा पारा १६.७ अंशांवर

WhatsApp खाते सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:

  • वापरानंतर लॉगआउट करा: WhatsApp Web वापरून झाल्यानंतर ब्राउझर बंद करण्याऐवजी खात्यातील लॉगआउट पर्यायाचा वापर करा.
  • सार्वजनिक संगणकांचा वापर टाळा: सायबर कॅफे, हॉटेल, सार्वजनिक संगणक केंद्र किंवा अनोळखी व्यक्तीच्या संगणकावर WhatsApp Web उघडणे शक्यतो टाळावे.
  • खासगी ब्राउझिंगचा पर्याय निवडा: अपरिहार्य परिस्थितीत सार्वजनिक संगणक वापरावा लागल्यास इनकॉग्निटो किंवा प्रायव्हेट ब्राउझिंग मोडचा वापर करा. मात्र, यामुळे लॉगआउटची गरज संपत नाही.
  • संशयास्पद हालचाली तपासा: आपल्या खात्यावरून अनोळखी संदेश पाठवले जात असल्याचे किंवा संपर्कांकडून विचित्र प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्यास तातडीने खात्याची सुरक्षा तपासा.
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वेदांत काळे हत्या प्रकरणातील फरार संशयिताला राहुडबारी घाटातून अटक

डिजिटल व्यवहार आणि संवादासाठी WhatsApp चा वापर वाढत असताना, छोट्याशा निष्काळजीपणामुळे वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक संगणकावर WhatsApp Web वापरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790