नाशिक: आजपासून (दि. १९) YCMOU चा ‘इंद्रधनुष्य’- २२वा आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव २०२६ !

नाशिक। दि.१९ नोव्हेंबर २०२६: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आयोजित २२वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२६’ गुरुवार, दि. १९ नोव्हेंबरपासून नाशिकमध्ये सुरू होत आहे. ‘सांस्कृतिक कुंभ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठ परिसरातील गोदावरी मंडपम येथे होणार आहे. विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठ परिसराला ‘कविवर्य कुसुमाग्रज नगरी’ असे नाव देण्यात आले आहे.

शोभायात्रेने होणार सुरुवात:
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत शोभायात्रा निघेल. ग्रंथालय ते यशवंतराव चव्हाण पूर्णाकृती स्मारक शिल्प परिसर असा तिचा मार्ग आहे.

उद्घाटनाला मान्यवरांची उपस्थिती:
विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र संजय येनपुरे आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले हे उद्घाटक व प्रमुख अतिथी असतील. समारंभाचे अध्यक्षस्थान मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे भूषवतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चिमुकल्या स्पंदनची सामाजिक बांधिलकी; पिगी बँकेतील १,६०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द

विशेष उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते हे असतील. प्रमुख उपस्थितीत मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास शिंदे यांचा समावेश आहे.

या समारंभासाठी विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि कुलसचिव (प्र.) प्रा. (डॉ.) सुरेंद्र पाटोळे यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी १९ व २० नोव्हेंबर रोजी विशेष अभियान

पाच रंगमंचांवर रंगणार कलांचा इंद्रधनुष्य:
१९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, वक्तृत्व आणि ललित कला अशा विविध क्षेत्रांतील स्पर्धा पाच रंगमंचांवर होतील.

  • मंच क्र. १ – चित्रमहर्षी दादासाहेब फाळके मंच (गोदावरी मंडपम): उद्घाटनानंतर १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद (Folk Orchestra) सादर होईल. २० नोव्हेंबरला भारतीय समूहगान, २१ नोव्हेंबरला भारतीय शास्त्रीय नृत्य व पाश्चिमात्य समूहगान, तर २२ नोव्हेंबरला भारतीय लोकसमूह नृत्य होईल. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत समारोप व बक्षीस वितरण होईल.
  • मंच क्र. २ – पं. विष्णू दिगंबर पलुस्कर मंच (शैक्षणिक सभागृह): सुगमसंगीत, पाश्चिमात्य गायन व वाद्यसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय गायन तसेच शास्त्रीय तालवाद्य व स्वरवाद्य.
  • मंच क्र. ३ – प्रा. वसंत कानेटकर मंच (शैक्षणिक इमारत प्रांगण): एकांकिका, मूकनाट्य, प्रहसन (स्किट) आणि नकला (मिमिक्री) सादर होतील.
  • मंच क्र. ४ – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मंच (यश इन सभागृह): वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा (लेखी व अंतिम फेरी) आणि वादविवाद स्पर्धा होतील. प्रश्नमंजुषेची लेखी फेरी परीक्षा विभागाच्या पहिल्या मजल्यावर होईल.
  • मंच क्र. ५ – शिल्पकार राम सुतार मंच (ग्रंथालय हॉल, ग्रंथालय परिसर आणि दृक-श्राव्य विभाग): येथे मातीकला, चिकटकला (कोलाज), रांगोळी, व्यंगचित्र, पोस्टर मेकिंग, स्थळ चित्र, स्थापना (इन्स्टॉलेशन), स्थळ छायाचित्रण आणि लघुचित्रपट होतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790