
नाशिक। दि. १५ नोव्हेंबर २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक या शासकीय कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज असल्याचे भासवणाऱ्या एका Instagram अकाउंटविरोधात नाशिक शहर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक शहर सायबर पोलीस स्टेशनचे सायबर पेट्रोलिंग पथक सोशल मीडियावरील संशयास्पद हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांच्या निदर्शनास Instagram वरील official.kumbhnagari_nashik नावाचे अकाउंट आले.
या अकाउंटची तपासणी केली असता, त्यावरून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यक्रमांसंदर्भातील रील्स आणि पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याचे आढळले. अकाउंटचे नाव आणि स्वरूप पाहता ते सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक या शासकीय कार्यालयाचे अधिकृत पेज असल्याचा भास निर्माण होत होता. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी संबंधित अकाउंटधारकाविरुद्ध कारवाई केली.
याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २०४ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६६(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अधिकृत वेबसाइट आणि व्हेरिफाइड हँडलवरच विश्वास ठेवा!:
दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच इतर शासकीय योजना आणि कार्यक्रमांची माहिती मिळवताना नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत वेबसाइट्स आणि प्रमाणित (Verified) सोशल मीडिया अकाउंट्सवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर कोणतेही बनावट किंवा संशयास्पद अकाउंट आढळल्यास त्याची माहिती तातडीने नाशिक शहर सायबर पोलीस स्टेशनला द्यावी. यासाठी नागरिकांनी सायबर पोलिसांच्या 9923323311 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा आपत्कालीन हेल्पलाइन 112 वर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
![]()


