Amazon

नाशिकरोड रेल्वे स्थानकात १ कोटी ४८ लाखांची रोकड जप्त; अमृत भारत एक्स्प्रेसमधील तरुण ताब्यात

नाशिक। दि. १४ नोव्हेंबर २०२६: छठपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर राबविण्यात येत असलेल्या विशेष सुरक्षा मोहिमेदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) नाशिकरोड स्थानकात मोठी कारवाई केली आहे. अयोध्या कँट-मुंबई एलटीटी अमृत भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाकडून तब्बल १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या रोकडीच्या स्रोताबाबत समाधानकारक माहिती किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने संबंधित तरुणासह रोकड पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या आरपीएफ पथकाने ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत ही कारवाई केली. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक एन. पी. सिंह यांच्या नेतृत्वात रेल्वे स्थानकावर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात २४ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

संशयास्पद हालचालींमुळे तरुणाची तपासणी:
१२ नोव्हेंबर २०२६ रोजी ट्रेन क्रमांक २२११२ अयोध्या कँट-मुंबई एलटीटी अमृत भारत एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर दाखल झाली. यावेळी हातात बॅग घेऊन जाणाऱ्या एका तरुणाच्या हालचाली आरपीएफ कर्मचाऱ्यांना संशयास्पद वाटल्या.

मुख्य कॉन्स्टेबल नरेंद्र पाडवी, कॉन्स्टेबल गौतम बिराडे, कॉन्स्टेबल रवींद्र राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ संबंधित तरुणाला थांबवून चौकशी केली. त्याने आपले नाव संदीप बाळासाहेब भामरे (वय २४, मूळ रा. गोमवाडी, आटपाडी, जि. सांगली; सध्या रा. भवानी पेठ, जळगाव) असे सांगितले.

बॅगेतील साहित्याबाबत तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. त्यामुळे स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत बॅगेची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 'या' मतदारांना पुन्हा संधी; वाचा सविस्तर...

५०० रुपयांच्या २९ हजारांहून अधिक नोटा:
आरपीएफने जप्त केलेल्या रोकडमध्ये ५०० रुपयांच्या २९ हजार ३२२ नोटा, २०० रुपयांच्या ७१५ नोटा आणि १०० रुपयांच्या ६०० नोटांचा समावेश आहे. या सर्व नोटांची एकत्रित किंमत १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपये असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

रोकड कुठून आणली, तिचा मालक कोण आणि ती कोणत्या उद्देशाने नेली जात होती, याबाबत संबंधित तरुणाकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्याला या रकमेच्या स्रोताबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. तसेच, रोकड वाहतुकीसंदर्भातील कोणतीही कायदेशीर कागदपत्रे तो सादर करू शकला नसल्याचे आरपीएफने सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महसूल सेवक (कोतवाल) पदभरती परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी !

प्राप्तिकर विभागाकडून तपास सुरू:
प्रकरणाचे गांभीर्य आणि जप्त केलेल्या रकमेचे मोठे प्रमाण लक्षात घेऊन आरपीएफने प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण कक्ष-१, नाशिक येथील उपसंचालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरुण आणि जप्त केलेली संपूर्ण रोकड पुढील कायदेशीर कारवाईसाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

सध्या या रकमेचा मूळ स्रोत, मालकी आणि तिच्या वाहतुकीमागील कारणांचा तपास सुरू आहे. प्राप्तिकर विभागाच्या पडताळणीतून नेमकी माहिती समोर आल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, अमृत भारत एक्स्प्रेसमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने रेल्वे सुरक्षा यंत्रणेसह तपास यंत्रणांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, या कोट्यवधींच्या रोकडीमागचे नेमके रहस्य काय, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790