आधाराश्रमातील बालकांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी साजरी केली दिवाळी

नाशिक। दि. १२ नोव्हेंबर २०२६: दिवाळीचा सण म्हणजे आनंद, आपुलकी आणि मायेची देवाणघेवाण. याच भावनेतून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक येथील आधाराश्रमाला भेट देत बालकांसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत आधाराश्रमातील एका बालकाला अमेरिकेतील (यूएसए) परदेशी दाम्पत्याने दत्तक घेतले. बालकाला प्रेमळ कुटुंबाचा आधार मिळाल्याने या भेटीला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले.
दत्तक जागृती अभियानांतर्गत नोव्हेंबर महिन्यात देशभरात दत्तक जागृती महिना साजरा केला जातो. या अनुषंगाने आधाराश्रम येथे आयोजित कार्यक्रमात संस्थेने तयार केलेल्या दत्तकविषयक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. दत्तक प्रक्रियेबाबत समाजात जनजागृती निर्माण व्हावी आणि अधिकाधिक बालकांना कुटुंबाचा आधार मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर केळकर, सचिव हेमंत पाठक, कल्याणी दातार तसेच संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेत बालकांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना केल्या. संस्थेतील प्रत्येक बालकाचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी बालकांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) प्रवेश मिळवून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करावेत. बालकांना सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार असून, तो मिळवून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे दैनंदिन कामकाज अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी लोकसहभागातून निधी संकलन होणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील विविध ठिकाणी क्यूआर कोड (QR Code) लावून देणगी संकलनाची संकल्पना जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी मांडली. संस्थेच्या कामकाजासाठी समाजानेही आर्थिक योगदान देण्याचे आवाहन करत त्यांनी स्वतः संस्थेला आर्थिक देणगी दिली. तसेच निधी संकलनाच्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी आधाराश्रमातील बालकांशी हितगुज केले. त्यांना फराळाचे वाटप करून आस्थेने विचारपूस केली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बालकांनी दिवाळीनिमित्त तयार केलेले आकाशकंदील, पणत्या व शोभेच्या वस्तूंचे त्यांनी कौतुक केले. दिवाळी अनाथ बालकांसोबत साजरी करणे म्हणजे केवळ औपचारिकता नव्हे, तर त्यांच्या आनंदात प्रत्यक्ष सहभागी होणे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे कार्यवाह श्री. पाठक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. केळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच दत्तक घेतलेल्या बालकाचा फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यास संमती देणारे दत्तक पालक अजय वृषाली मोरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
![]()


