Amazon

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात आठ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

नाशिक। दि. ४ नोव्हेंबर २०२६: दुर्गम सुरगाणा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा येथे आयोजित विशेष बालरोग शस्त्रक्रिया शिबिरात आठ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये पाच हर्निओटॉमी आणि तीन सर्कमसीजन शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवेच्या विस्तारातून आदिवासी भागातील बालकांना स्थानिक स्तरावरच उपचार उपलब्ध होत असल्याचे या कामगिरीने अधोरेखित केले आहे.

बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास पालकांसह संपूर्ण कुटुंबाची चिंता वाढते. त्यातच उपचारांसाठी दूरच्या शहरात जावे लागल्यास प्रवासाचा त्रास, आर्थिक खर्च आणि मानसिक ताण सहन करावा लागतो. मात्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुसज्ज शस्त्रक्रियागृह, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि कुशल वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने दुर्गम भागातील रुग्णांनाही आवश्यक शस्त्रक्रिया स्थानिक स्तरावर करून घेणे शक्य होत आहे. त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 9.91 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सुरगाण्यासारख्या दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया स्थानिक ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध व्हाव्यात, हा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा मानस आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार शिंपी यांनी या शिबिराचे नियोजन केले. त्यानुसार गरजू बाल रुग्णांची पूर्वतपासणी करून शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोकसहभागातून जलसंधारणाला बळ; १८ गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी

या शिबिरात पाच बालकांवर हर्निओटॉमी, तर तीन बालकांवर सर्कमसीजन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. हर्निओटॉमी शस्त्रक्रियेमध्ये हर्नियाशी संबंधित पिशवीवर आवश्यक उपचार केले जातात. लहान मुलांमध्ये ही शस्त्रक्रिया सामान्यतः जाळीचा वापर न करता केली जाते, तर अग्रत्वचेचा अडथळा, वारंवार होणारा संसर्ग किंवा अन्य वैद्यकीय कारणांमुळे सर्कमसीजन शस्त्रक्रिया केली जाते.

विशेष म्हणजे, ग्रामीण रुग्णालय, सुरगाणा येथे यापूर्वी प्रथमच सिझेरियन प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली आहे. त्यापाठोपाठ आठ बालकांवरील शस्त्रक्रियांचे यशस्वी आयोजन झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांची क्षमता आणि कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.

या शस्त्रक्रिया शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. समाधान पाटील, डॉ. विलास चव्हाण, डॉ. किरण डोन्नर आणि शस्त्रक्रियागार सहाय्यक श्री. प्रवीण यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. संदीप सूर्यवंशी तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय चौधरी यांचे त्यांना सहकार्य लाभले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पाच मिठाई दुकानांचे परवाने निलंबित; एफडीएची कारवाई

दुर्गम भागातील नागरिकांना मोठ्या शहरांवर अवलंबून न राहता स्थानिक स्तरावरच दर्जेदार आणि तज्ज्ञ वैद्यकीय उपचार मिळावेत, या उद्देशाने आरोग्य विभागाकडून ग्रामीण आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातील ही कामगिरी आदिवासी भागातील आरोग्यसेवेच्या विस्ताराला नवी दिशा देणारी असून, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790