Amazon

नाशिक डाक विभागात ६ नोव्हेंबरला पेन्शन अदालत; ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक। दि. ३ नोव्हेंबर २०२६: भारतीय टपाल विभागाच्या नाशिक विभागातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शुक्रवार ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डाक पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवर अधीक्षक डाकघर, नाशिक विभाग यांच्या कार्यालयात, जी.पी.ओ. कंपाऊंड, नाशिक येथे ही अदालत होणार आहे.

निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनासंदर्भातील विविध अडचणी व तक्रारी मांडण्यासाठी या अदालतीच्या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे. संबंधितांनी आपल्या तक्रारी विहित नमुन्यात सादर कराव्यात. हे अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर, नाशिक विभाग, नाशिक-१ या पत्त्यावर बुधवार ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतीमध्ये समावेश केला जाणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप; मृताच्या आई-वडिलांना एक लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश

अर्जामध्ये निवृत्तीवेतनधारकाचे किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे नाव, निवृत्ती अथवा मृत्यूच्या वेळी असलेले पदनाम, सेवेतून निवृत्त झालेल्या कार्यालयाचे नाव, निवृत्तीची तारीख, पीपीओ क्रमांक, निवृत्तीवेतन मिळत असलेल्या पोस्ट ऑफिसचे नाव, संपूर्ण पत्ता व दूरध्वनी क्रमांक, तक्रारीचा थोडक्यात तपशील तसेच अर्जदाराची स्वाक्षरी व दिनांक नमूद करणे आवश्यक आहे. तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक असल्यास स्वतंत्र विवरणपत्रही जोडता येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पिकांचे अवशेष व नैसर्गिक गवताचे संवर्धन करण्याचे आवाहन

दरम्यान, कायदेशीर स्वरूपाचे वादग्रस्त मुद्दे, वारसा प्रमाणपत्र, काल्पनिक निवृत्तीवेतन, टीबीओपी/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे, धोरणात्मक बाबी, शिस्तभंगविषयक प्रकरणे तसेच विभागीय पदोन्नती समितीच्या (डीपीसी) पुनरावलोकनासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा या पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार नाही.

नाशिक विभागातील संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी विहित नमुन्यात आवश्यक तपशीलांसह अर्ज निर्धारित मुदतीत सादर करून या पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, नाशिक विभाग यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790