नाशिक (प्रतिनिधी) : शहरात दिवसेंदिवस वाहनसंख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून वाहतूक कोंडी आटोक्यात आणण्यासाठी सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौक दरम्यान उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे.
शहरात नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर दुसऱ्या बाजूला वाहनांची संख्या देखील वाढते आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शहरातील मायको सर्कल, त्रिमूर्ती चौक, द्वारका, शालिमार चौक, एबीबी सर्कल, मुंबई नाका, पंचवटी कारंजा, आडगाव नाका, महात्मानगर, पाथर्डी फाटा या ठिकाणी वाहनांमुळे रोजच वाहतूक कोंडी निर्माण होते. ही वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने स्थानिक नागरिकांकडून या भागात उड्डाणपूल बसविण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या दिशेने पावले उचलत मायको सर्कल पाठोपाठ सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौक दरम्यान सव्वा किलोमीटरचा उड्डाणपूल तयार करणार आहे. येत्या ३ वर्षात हे दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होणार असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.