Amazon

नाशिक: जिल्ह्यातील बँकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मंजूर मदतीतून कर्जवसुली करू नये

नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२६: खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची अग्रिम मदत मंजूर करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या अग्रिम मदतीतून तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या अनुदानातून जिल्ह्यातील सर्व बँकांनी कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये. तसेच संबंधित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर ती रक्कम होल्ड अथवा कपात करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपुत यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये थंडीची चाहूल; किमान तापमान १४.३ वर, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

या मदतीसह नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात दिलासा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान बाधीत शेतकऱ्यांना विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी शासनाची मदत व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात वळती करण्यात येऊ नये.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित

तसेच सदर रक्कम जमा झालेल्या बँक खात्यावर होल्ड ठेवणे अथवा रक्कम काढण्यास प्रतिबंध करणे, अशा प्रकारची कार्यवाही करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी अशा प्रकारे रक्कम वळती केली असल्यास किंवा खात्यावर होल्ड ठेवले असल्यास, प्रकरणांची तपासणी करून लागू कायदे व नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, नाशिक तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व इतर बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना या निर्देशांची माहिती देऊन त्यांचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी. या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास लागू कायदे व नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्व संबंधित बँकांनी या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपुत यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790