नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पांडवलेणी डोंगर याठिकाणी ३ मुले भटकंती करण्यासाठी गेले होते. मात्र, निम्मा डोंगर चढल्यानंतर रस्ता न उमजल्याने त्यांनी प्रशासनाकडे मदत मागितली. दरम्यान, पोलिस, अग्निशमन विभाग, शीघ्र कृती दल व वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण संस्थेच्या सदस्यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत त्यांची सुखरूप सुटका केली.
भटकंतीची आवड असलेली मंडळी नेहमीच पांडवलेणी डोंगरावर जात असतात. ही मंडळी चढाईसाठी आवर्जून डोंगराच्या पाठीमागील बाजू निवडतात व हा रस्ता वनविभागाच्या राखीव वनातून जातो. भटकंती करण्याच्या नादात ही हौशी मंडळी सोबत सुरक्षिततेची कोणतीही साधने न घेता चढाई करतात. त्यामुळे हे धाडस बऱ्याच वेळा त्यांना महागात पडते. बुधवारी (दि.८) रोजी पाथर्डी फाटा परिसरातील आयुष तुळसकर (२०), सुमित तुळसकर (१७) व समर्थ शिल्लक (१७) या तिन्ही मुलांनी बाहेर फिरायला जातो आहे. असे सांगून, सकाळी ९ वाजता अवघड वाटेने डोंगर चढाई करण्यास सुरुवात केली. चढाईचा रस्ता धोकादायक असल्याने रस्ता न उमजल्याने तिघे अश्या टप्प्यावर पोहचले, जेथून माघारी फिरणे व पुढे जाणे अशक्य होते. म्हणून तिघांनी त्याच ठिकाणी थांबून पोलिस नियंत्रण कक्ष व अग्निशमन दलाकडे मदत मागितली. माहिती मिळताच तातडीने सिडको अग्निशमन दलाचे जवान डोंगराच्या पायथ्याशी पोहचले. जवानांनी अडकलेल्या मुलांना भोंग्याने सूचना देत धीर दिला. त्यावेळी वैनतेय संस्थेच्या पथकाच्या मदतीने जवानांनी दोरखंड व जाळी घेऊन मोहीम सुरु केली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने अखेर ३ ही मुलांची सुटका करण्यात यश आले.