Amazon

नाशिक: ‘सिंहस्थ पार्टनर्स’ बैठकीत सीएसआर, तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा

नाशिक। दि. २३ ऑक्टोबर २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीत उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग मिळविण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने बुधवारी ‘सिंहस्थ पार्टनर्स – सीएसआर सीईओ मीट’चे आयोजन करण्यात आले. या बैठकीत कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात आरोग्यसेवा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञान आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रांत सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रमोद पवार यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करताना उद्योग क्षेत्रातील अनुभव, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण उपायांचा उपयोग करून घेणे, तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांसाठी दीर्घकालीन लाभ निर्माण करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ध्वजारोहण सोहळ्यात होणार अधिकृत कुंभ संकेतस्थळाचे अनावरण; टप्प्याटप्प्याने विकसित होणार डिजिटल व्यासपीठ

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्यतेचा विचार करता, या आयोजनाची जबाबदारी केवळ प्रशासनापुरती मर्यादित नसून विविध क्षेत्रांच्या सहभागातून ती अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

“सिंहस्थ कुंभमेळा हे नियोजन, नावीन्य आणि सामूहिक जबाबदारीच्या माध्यमातून दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. कंपन्यांनी त्यांचे तांत्रिक कौशल्य, अनुभव आणि नावीन्यपूर्ण उपाय प्रशासनासोबत सामायिक करावेत. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांना उत्तम सुविधा देण्यासोबतच स्थानिक नागरिकांनाही दीर्घकाळ लाभदायी ठरतील, अशा भागीदारी विकसित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे सिंह म्हणाले.

आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणाला प्राधान्य:

बैठकीत आरोग्यसेवा व आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, सार्वजनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, डिजिटल तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये कॉर्पोरेट कंपनांना सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली. भाविकांची सुरक्षितता आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचाही विचार करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रण

कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न ठेवता, त्यांच्या तांत्रिक क्षमता, व्यावसायिक अनुभव आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करून घेण्यावर प्रशासनाने भर दिला.

अतिरिक्त आयुक्त प्रमोद पवार यांनीही प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांशी सुसंगत उपक्रम राबविण्यासाठी उद्योग क्षेत्र आणि प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

“‘सिंहस्थ पार्टनर्स’च्या माध्यमातून उद्योग क्षेत्र आणि प्रशासनाला एकत्र येऊन प्राधान्याच्या विषयांवर व्यावहारिक उपाय शोधण्याची संधी मिळत आहे. आरोग्य, स्वच्छता, तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विकास अशा विविध क्षेत्रांत कंपन्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार योगदान द्यावे. उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शकता आणि त्यातून प्रत्यक्ष परिणाम साधणे यावर आमचा भर असेल,” असे पवार म्हणाले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीला NMA ची मंजुरी

कुंभमेळ्यानंतरही उपक्रमांचे लाभ कायम राहणार:
सिंहस्थ कुंभमेळा हा निश्चित कालावधीसाठी होणारा सोहळा असला, तरी या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुविधा, पर्यावरणपूरक व्यवस्था, तंत्रज्ञानाधारित सेवा आणि सामाजिक विकासाच्या उपक्रमांचा लाभ नागरिकांना पुढील अनेक वर्षे मिळावा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.

सीएसआर उपक्रमांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि योग्य समन्वय राखण्याची भूमिका प्राधिकरणाने मांडली. कंपन्यांच्या सूचना आणि संकल्पना जाणून घेऊन परस्पर सहकार्याच्या माध्यमातून विविध प्रकल्प विकसित करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790