Amazon

नाशिक: विष्णू काकविपुरे मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

नाशिक। दि. २२ ऑक्टोबर २०२६: जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या विष्णू आनंद काकविपुरे यांच्या मृत्यू प्रकरणाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील वैद्यकीय उपचारांची प्रक्रिया आणि संभाव्य त्रुटींची पडताळणी करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. तसेच, चौकशी पूर्ण करून सात दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) सायंकाळी विष्णू काकविपुरे यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शिवसेनेचे पदाधिकारी दीपक डोके आणि मृताच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रुग्णाला वेळेत आणि आवश्यक उपचार मिळाले का, यासह रुग्णालयातील वैद्यकीय सेवांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

निवेदनात रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागातील सेवा, डॉक्टरांची उपस्थिती, सोनोग्राफी तपासणीची व्यवस्था आणि रुग्णाला खासगी केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यामागील कारणांबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाचे तज्ज्ञ समितीमार्फत डेथ ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीचा सविस्तर अहवाल सात दिवसांच्या आत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाची प्रत आरोग्य सेवा उपसंचालक आणि पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनाही पाठवण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: द्वारका चौकातील जागेसाठी सुनावणी; १०९ पैकी ७६ व्यावसायिकांना नोटिसा

चौकशीत या प्रमुख बाबी तपासणार:
चौकशी समितीकडून सर्वप्रथम मृत रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी, यकृताशी संबंधित आजार किंवा इतर पूर्वव्याधी तसेच संदर्भ रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात हलवतानाची प्रकृती तपासली जाणार आहे. रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यापासून देण्यात आलेले उपचार आणि केसपेपरमधील नोंदींचीही सखोल पडताळणी केली जाईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी १३ कोटी ८४ लाखांचा कृती आराखडा

याशिवाय, रुग्ण आपत्कालीन विभागात दाखल झाला त्या वेळी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा, डॉक्टरांची उपस्थिती आणि त्याला तातडीने देण्यात आलेले उपचार यांची माहिती घेतली जाणार आहे. रुग्णाला खासगी केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यामागे कोणती वैद्यकीय किंवा तांत्रिक कारणे होती, याचीही वस्तुस्थिती तपासून निष्कर्ष अहवालात नमूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चौकशी समितीच्या अहवालातून या मृत्यूप्रकरणातील वैद्यकीय उपचारांची प्रक्रिया आणि संबंधित बाबी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790