Amazon

नाशिक: सेमीकंडक्टर व संरक्षण उद्योग क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद

नाशिक। दि. २१ ऑक्टोबर २०२६: नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि भविष्यातील गुंतवणुकीच्या संधींचा प्रभावीपणे उपयोग करणे आवश्यक आहे. सेमीकंडक्टर तसेच संरक्षण उद्योग क्षेत्रातील उदयोन्मुख संधींचा लाभ घेण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा. तसेच, पीएम-सेतू (PM-SETU) योजनेत सक्रिय सहभाग नोंदवून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान कौशल्य आणि रोजगारक्षमतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण’ (PM-SETU) योजनेअंतर्गत नाशिक येथे आयोजित उद्योग मेळाव्यात ते बोलत होते. कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि उद्योगांच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी दोन आठवड्यांत आराखडा द्या! उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश

या मेळाव्यास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, प्रादेशिक कार्यालय नाशिकचे सहसंचालक अनिल गवित, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे उपसंचालक रमण पाटील, नाशिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष नहार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि ३० हून अधिक प्रमुख उद्योगसमूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रासह सेमीकंडक्टर क्षेत्रातील उदयोन्मुख संधी आणि प्रस्तावित संरक्षण उद्योग समूहाच्या (Defence Cluster) माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगार व औद्योगिक विकासाच्या संधी अधोरेखित केल्या. या संधींचा लाभ घेण्यासाठी उद्योगांनी कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय वाढविणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक श्री. सूर्यवंशी यांनी उद्योगांनी पीएम-सेतू योजनेकडे केवळ आर्थिक सहाय्याची योजना म्हणून न पाहता, उद्योगांच्या विशिष्ट गरजांनुसार प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ घडविण्याची महत्त्वपूर्ण संधी म्हणून पाहावे, असे प्रतिपादन केले.

उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजांशी सुसंगत कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि प्रशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, यासाठी उद्योगांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योग आणि प्रशिक्षण संस्था यांच्यातील समन्वय वाढल्यास युवकांची रोजगारक्षमता वृद्धिंगत होण्यासोबतच उद्योगांनाही आवश्यक कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: द्वारका चौकातील जागेसाठी सुनावणी; १०९ पैकी ७६ व्यावसायिकांना नोटिसा

मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्री. गवित यांनी पीएम-सेतू योजनेची आवश्यकता, उद्दिष्टे आणि या योजनेच्या माध्यमातून उद्योग व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती दिली. उद्योगांच्या मनुष्यबळविषयक गरजा पूर्ण करणे, युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उद्योगांची उत्पादकता वाढविण्यासाठी कौशल्य विकासाला चालना देणे, यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790