Amazon

नाशिक: रबडी दुकानात धक्कादायक प्रकार; सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या, FDA ची कारवाई

नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२६: सिडको परिसरातील ‘श्री राम रबडीवाला’ या दुकानात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत रबडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या आढळून आल्या. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शैक्षणिक योजनांच्या लाभासाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ

अन्न व औषध प्रशासनाकडून शहरात विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पाटीलनगर येथील राजीव गांधी मार्केट परिसरात असलेल्या मे. श्री राम रबडीवाला या दुकानाची तपासणी करण्यात आली. यावेळी रबडीसाठी वापरल्या जाणाऱ्या सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या आढळल्या. अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे आणि संकेत येळमामे यांनी कारवाई करत निकृष्ट आढळलेला पदार्थ जप्त केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 27 ऑक्टोबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

तपासणीत अन्नपदार्थांची स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे उल्लंघन झाल्याचे तसेच अन्न सुरक्षा नियमांमधील परिशिष्ट ४ मधील तरतुदींचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित आस्थापनेविरुद्ध तातडीची कारवाई केली.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी सुरू असून, अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या मोहिमेतून स्पष्ट होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790