नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२६: शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत मोठा नफा मिळवण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या एका नामांकित कंपनीच्या निवृत्त व्यवस्थापकाला तब्बल ९८ लाख ६० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. सोशल मीडियावरील शेअर ट्रेडिंग ग्रुपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित निवृत्त अधिकाऱ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हीआयपी शेअर ट्रेडिंग ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. ग्रुपमधील एका बनावट सदस्याने दररोज लाखो रुपयांचा नफा मिळत असल्याचे सांगत बनावट संदेश आणि नफ्याचे स्क्रीनशॉट पाठवले. दहा लाख रुपयांची गुंतवणूक करून २५ लाख रुपये कमावल्याचा दावाही करण्यात आला. इतर सदस्यांनाही मोठा नफा होत असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.
यानंतर ग्रुपच्या ॲडमिनने फिर्यादीला बनावट ट्रेडिंग पोर्टलच्या लिंक पाठवल्या. सुरुवातीला त्यांनी काही हजार रुपयांची गुंतवणूक केली असता, संबंधित पोर्टलवरील डॅशबोर्डवर नफा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर २५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ४० हजार रुपये झाल्याचे भासवण्यात आले. त्यापैकी २५ हजार रुपये प्रत्यक्ष बँक खात्यात जमा करण्यात आले. सुरुवातीला पैसे परत मिळाल्याने फिर्यादीचा संबंधित ट्रेडिंग योजनेवरील विश्वास अधिक दृढ झाला.
यानंतर परदेशी क्रमांकांवरून फोन करून मोठी गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवण्याची संधी असल्याचे सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून निवृत्त अधिकाऱ्याने आपली बचत टप्प्याटप्प्याने विविध ४६ बँक खात्यांमध्ये जमा केली. अशा प्रकारे एकूण ९८ लाख ६० हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले. दरम्यान, बनावट ट्रेडिंग पोर्टलवर त्यांच्या गुंतवणुकीवर दोन कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले.
मात्र, हा नफा प्रत्यक्षात मिळवून देण्याच्या आमिषातूनच फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
![]()


