नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. त्यामुळे शाळा सुरु होणार नसल्याने शिक्षकांची मोफत कोरोन चाचणीसुद्धा बंद राहणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी सांगितले.
राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे महाविद्यालयात रुजू होण्याअगोदर शिक्षकांना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर कोविड केअर सेंटरमध्ये मोफत कोविड चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्याअंतर्गत ८ हजार २६९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वाब घेण्यात आले होते. त्यामध्ये ३७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र शाळा बंदच राहणार असल्याने कोरोन चाचणीतून शिक्षकांना वगळण्यात आल्याचे समजते.