नाशिक। दि. १५ ऑक्टोबर २०२६: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहे.
त्यानुषंगाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी 30 ऑक्टोबर,2026 पर्यंत ऑफलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचा अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक-११ या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक संतोष चव्हाण यांनी केले आहे.
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजनेंतर्गत बारावीनंतर व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील रिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल. ज्या पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष उत्तीर्ण केले आहे, त्यांना त्याच पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेशाची तरतूद आहे.
![]()


