Amazon

नाशिक: अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी; पीडितेला 1 लाखाची भरपाई देण्याचे आदेश

नाशिक। दि. १३ ऑक्टोबर २०२६: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, पीडित मुलीला एका महिन्याच्या आत एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

विवेक भाऊसाहेब निकम (वय १९, रा. शिवाजी चौक, भारतनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुलै २०१७ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही घटना घडली होती. त्यावेळी १५ वर्षे सात महिने वय असलेल्या मुलीला आरोपीने लग्नाचे आश्वासन देत आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याचे समोर आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जुन्या वादातून दोघांना मारहाण; सोन्याची चेन आणि रोकड लुटल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक

या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा विकासकामांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाचा निकाल:
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्यासमोर झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब, पंचांच्या साक्षी तसेच तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयापुढे मांडलेली माहिती विचारात घेण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी विवेक निकम याला दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला गती- आयुक्त शेखर सिंह

पीडितेला एका महिन्याच्या मुदतीत एक लाख रुपये नुकसानभरपाई अदा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. निर्धारित मुदतीत भरपाईची रक्कम न दिल्यास आरोपीला आणखी एक वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार असल्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. भानुप्रिया पेठकर यांनी युक्तिवाद केला. तसेच अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी सुदाम सांगळे, महिला पोलिस हवालदार रंजना गायकवाड आणि पैरवी महिला पोलिस अंमलदार कविता महाले यांनी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पाठपुरावा केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790