Amazon

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला गती- आयुक्त शेखर सिंह

नाशिक। दि. १३ ऑक्टोबर २०२६: आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामे, गोदाघाट परिसरातील सुविधा, रामतीर्थ व कुशावर्त तीर्थ येथील कामे, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनाला गती देण्यात येत आहे.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलिस यंत्रणा, लोकप्रतिनिधी, विविध आखाडे आणि विविध धार्मिक संस्थांमध्ये समन्वय साधून कामे करण्यात येत असून, भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर असल्याची माहिती नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

प्राधिकरणाच्या कार्यालयात आज दुपारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, श्री भक्तीचरणदास महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ला, श्री. पंचाक्षरी आदी उपस्थित होते.

आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले की, ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांच्या उपस्थितीत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. आगामी कार्यक्रमांची रूपरेषा सध्या प्राथमिक स्वरूपात असून, संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक निर्णय अंतिम करण्यात येणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक आणि परिसरातील हालचालींचे नियोजन यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारण व पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य- मंत्री जयकुमार गोरे

धार्मिक कार्यक्रमांसाठी संस्थांशी समन्वय:
ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक संस्था, आखाडे आणि संत-महंतांशी चर्चा करून त्यांच्या आवश्यकतांची माहिती घेण्यात येणार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करताना संबंधित संस्थांचा सहभाग, भाविकांची ये-जा आणि सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता, पार्किंग यांचा विचार केला जाणार आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत आहेत.

२५ ऑक्टोबर रोजी शंखनाद:
ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रम होतील. यात २५ ऑक्टोबर २०२६ रोजी शंखनाद होईल. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. त्याचे प्रमाणपत्र ध्वजारोहण सोहळ्यात प्रदान करण्यात येईल. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण, प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, काॅफीटेबल बुकचे प्रकाशन, सायंकाळी गोदावरी नदीची आरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जुन्या वादातून दोघांना मारहाण; सोन्याची चेन आणि रोकड लुटल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक

नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन:
या सोहळ्याच्या पूर्वतयारीदरम्यान काही कामांमुळे नागरिकांना तात्पुरता त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, ही कामे भाविकांच्या सुविधा आणि शहराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा. सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून तयारी वेळेत पूर्ण करून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

स्वच्छता आणि घाटविकासाच्या कामांना प्राधान्य:
महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सांगितले की, ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्यावतीने व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. रामकुंड परिसरासह गोदावरी नदीच्या घाटांवर स्वच्छता, परिसर सुशोभीकरण आणि आवश्यक पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. गांधी तलाव परिसरातील स्वच्छतेचे कामही हाती घेण्यात आले आहे. बांधकामांमुळे साचलेला राडारोडा आणि अनावश्यक साहित्य हटवून परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' चार मार्गांवर सिटीलिंकच्या अतिरिक्त बसफेऱ्या

गोदाघाट परिसरातील बांधकामे, फरसबंदी, काँक्रीटीकरण आणि अन्य आवश्यक कामे नियोजनानुसार पूर्ण करण्यात येणार आहेत. भाविकांसाठी शौचालयांसारख्या मूलभूत सुविधा कार्यान्वित करण्याबरोबरच परिसरातील स्वच्छता आणि व्यवस्थापनाची कामेही प्राधान्याने केली जात आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी दिली.

यावेळी भक्तीचरणदास महाराज यांनी आखाड्यांच्या माध्यमातून तसेच श्री. शुक्ल, श्री. पंचाक्षरी यांनी पुरोहित संघाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली.

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा हा सर्व नाशिककर नागरिकांचा सोहळा आहे. या सोहळ्यात सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. – शेखर सिंह, आयुक्त, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790