नाशिक। दि.१३ सप्टेंबर २०२६: ‘तुमच्या नावाने उघडलेल्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग झाले आहे’, अशी भीती निर्माण करून सायबर भामट्याने एका सेवानिवृत्त वृद्धेला तब्बल १५ लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार उपनगर परिसरात समोर आला आहे. टेलिफोन विभाग आणि तपास यंत्रणांचा अधिकारी असल्याचे भासवत संबंधित महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. त्यानंतर मुदत ठेवी मोडण्यासह सोन्याचे दागिने तारण ठेवून मिळालेली रक्कम बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
उपनगर परिसरातील या वृद्ध महिलेला अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण टेलिफोन खात्यातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावावर सीमकार्ड जारी करण्यात आले असून, त्या क्रमांकाच्या माध्यमातून दिल्लीतील एका बँकेत खाते उघडण्यात आल्याचा दावा आरोपीने केला.
या खात्यात मनी लॉन्ड्रिंग, अमली पदार्थांची तस्करी आणि मानवी तस्करीशी संबंधित तब्बल ६ कोटी ८० लाख रुपये जमा झाल्याचे सांगत महिलेला गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचेही सांगून आरोपीने त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली मानसिक दबावाखाली ठेवले.
यानंतर व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून महिलेला त्यांच्या मुदत ठेवी मोडण्यास सांगण्यात आले. तसेच सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. चौकशीसाठी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी संपर्क साधणार असल्याचे सांगून त्यांची भीती आणखी वाढवण्यात आली.
पुढे आरोपीने व्हॉट्सअॅपवर एक पत्र पाठवून मुदत ठेवींमधून मिळालेली रक्कम तसेच सोन्याचे दागिने तारण ठेवून घेतलेल्या कर्जाची रक्कम अशा स्वरूपात एकूण १५ लाख रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. आरोपीच्या दबावाला बळी पडून महिलेने ही रक्कम अन्य बँक खात्यांमध्ये वर्ग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सायबर गुन्हेगारांकडून पोलिस, बँक, दूरसंचार विभाग किंवा रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना घाबरवण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा प्रकारे फोन किंवा व्हिडीओ कॉलवरून पैसे वर्ग करण्यास सांगितल्यास कोणतीही रक्कम देऊ नये आणि तत्काळ पोलिस किंवा अधिकृत सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधावा.
![]()


