नाशिक। दि. १२ सप्टेंबर २०२६: पीएम-ई बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेस अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. शहरातील ५० ई-बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील बससेवा मंगळवार, १५ सप्टेंबरपासून दोन प्रमुख मार्गांवर सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे या बसेसमध्ये वातानुकूलित (एसी) सुविधा उपलब्ध असली, तरी प्रवाशांना सध्याच्या बस भाडेदरानुसारच प्रवास करता येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी ई-बसेसचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर बसेसचे आरटीओ पासिंग, तांत्रिक तपासणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आता या बसेस नियमित प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात मार्ग क्रमांक १०२ वर तपोवन टर्मिनस ते अशोकनगर, तर मार्ग क्रमांक १०३ वर तपोवन टर्मिनस ते सिम्बायोसिस कॉलेज या मार्गावर ई-बसेस धावणार आहेत. या दोन्ही मार्गांवर शहरातील जुना आडगाव नाका, सीबीएस, रविवार कारंजा, राजीव गांधी भवन, वेद मंदिर, पवननगर यांसह महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील सेवेला प्रतिसाद मिळाल्यानंतर उर्वरित ई-बसेसही टप्प्याटप्प्याने शहरातील विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिककरांना पर्यावरणपूरक, शांत आणि एसी सुविधेचा आरामदायी प्रवास उपलब्ध होणार आहे.
![]()


