राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज, वाचा सविस्तर…

नाशिक/मुंबई | दि. १३ सप्टेंबर २०२६: राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्यातच सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटूनही अनेक भागांत पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असताना मराठवाडा, विदर्भ, सोलापूरसह राज्यातील विविध भागांमध्ये पावसाअभावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑगस्टपासून पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीचा फटका आता खरीप पिकांना बसू लागला आहे. सोयाबीन, कापूस, मका, बाजरी यांसारख्या पिकांची अवस्था पाण्याअभावी गंभीर होत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या अपेक्षांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काही प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक बनत आहे.

🔎 हे वाचलं का?:  ‘एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास अद्याप सुरू झालेला नसून, आगामी काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

१५ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता:
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 25 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

१३ सप्टेंबरलाही ‘यलो अलर्ट’:
पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिककरांसाठी खुशखबर! एसी ई-बसमधून आरामदायी प्रवास; भाडे मात्र पूर्वीइतकेच, १५ सप्टेंबरपासून सेवा सुरू

१४ सप्टेंबरला या भागांत सावधगिरीचा इशारा:
नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रत्यक्षात किती पाऊस पडतो, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790