नाशिक। दि. १० सप्टेंबर २०२६: भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी व तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम हे 10 सप्टेंबर, 2026 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे आढावा बैठक घेणार आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
या बैठकीस नाशिक जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्रारूप मतदार यादीबाबत नागरिकांना काही आक्षेप किंवा सूचना असल्यास त्यांनी मतदार यादी निरीक्षकांशी 0253-2461909 या क्रमांकावर संपर्क साधावा.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांनी तसेच दावे व हरकती असलेल्या नागरिकांनी ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती दाखल कराव्यात. तसेच १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह नमुना ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे.
नाशिक जिल्ह्यातील पात्र मतदारांचे नाव मतदार यादीतून वंचित राहू नये, या उद्देशाने प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या ASDD (गैरहजर, स्थलांतरित, मयत आणि दुबार) मतदारांची यादी, त्यामध्ये नाव समाविष्ट न होण्याची संभाव्य कारणांसह संबंधित मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच तसेच जिल्हा प्रशासनाच्या https://nashik.gov.in आणि https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना 6 किंवा नमुना 8, तर मतदार संघातील कोणताही मतदार मतदार यादीतून कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरता येणार आहे. संबंधित अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी तसेच आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0253-2310523 हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


