नाशिक। दि. ८ सप्टेंबर २०२६: शहरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने दुचाकी आणि मोबाइल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणात एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी आणि वाल्मीक चव्हाण यांना राजरत्ननगर, सिडको परिसरात एका व्यक्तीकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती युनिट-२चे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली. माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी राजरत्ननगर परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान तो विधिसंघर्षित बालक असल्याचे समोर आले. त्याच्या पालकांना घटनास्थळी बोलावून त्याच्याकडील दुचाकीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याने पवननगर स्टेडियमजवळून दुचाकी आणि मोबाइल चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे ४० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल आणि १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाइल, असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-२चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार तसेच पोलीस कर्मचारी नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, प्रविण वानखेडे, मनोज शिंदे, तेजस मते आणि जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने केली.
![]()


