नाशिक: नशामुक्तीसाठी जनसहभागातून व्यापक चळवळ उभी करूया- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

नाशिक। दि. ४ सप्टेंबर २०२६: अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात केवळ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून लढा देणे पुरेसे नसून या अभियानात समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जनसहभागतूनच नशेच्या नकारात्मक प्रवृत्तीला समाजातून हद्दपार करता येईल. युवक हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे प्रत्येक युवकाने अमली पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारालाही दूर ठेवण्याचा संकल्प करावा. युवकांनी अमली पदार्थांना ठामपणे ‘नो’ म्हणत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सजग रहावे, असे आवाहन राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

लोकनेते व्यंकटराव हिरे ऑडिटोरियम, कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालय सभागृहात राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या उपस्थितीत नशा मुक्त भारत , विकसित भारत की पहचान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार ॲड. राहूल ढिकले, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, पोलीस अधीक्षक (कृती) एम. एम. मकानदार, पोलीस उपायुक्त किशोर काळे, उपअधिक्षक सतीश गोराडे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, माजी आमदार डॉ. अपुर्व हिरे, नगरसेविका प्रियंका माने, जुई शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य सी. जी. दिघावकर, पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबई-धुळे मार्गिका खुली, उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत; द्वारका जंक्शनवरील वाहतुकीला दिलासा

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, नशामुक्त भारत, विकसित भारत या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून युवकांना व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमली पदार्थांविरोधात प्रभावीपणे कारवाई करण्यासोबतच व्यापक जनजागृती करण्यावर केंद्र व राज्य शासनाने भर दिला आहे. राज्यालाही अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पावले उचलली आहेत. नशा मुक्तीच्या अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये अमली पदार्थांविरोधात सकारात्मक संदेश पोहोचण्यास निश्चितच मदत होईल. तसेच अमली पदार्थांच्या माध्यमातून देशातील युवा पिढीची दिशा भरकटविण्याचे प्रयत्न होत आहेत. अमली पदार्थांच्या सेवनामुळे युवकांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर, कुटुंबावर तसेच सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होतात. सुरुवातीला केवळ कुतूहल, मित्रांचा आग्रह किंवा तणावातून केलेले सेवन पुढे व्यसनाचे रूप घेऊ शकते. त्यानंतर आरोग्याची हानी, आर्थिक नुकसान, कौटुंबिक कलह आणि सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अमली पदार्थांच्या सेवनापासून युवकांनी दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. युवकांना या संकटापासून दूर ठेवण्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि समुपदेशनावर भर देण्यात येत असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री डाॅ भोयर म्हणाले की, पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी अनेकदा स्वतःच्या गरजा कमी करून मेहनत घेतात. विद्यार्थीदेखील भविष्यातील करिअरसाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असतात. मात्र, चुकीची संगत, तणाव किंवा कुतूहलातून अमली पदार्थांच्या सेवनाची सुरुवात झाल्यास विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या संगतीकडेही लक्ष द्यावे.

🔎 हे वाचलं का?:  गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत

तसेच पालक, शिक्षक आणि समाज यांनी विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. अमली पदार्थांचे सेवन ही केवळ व्यक्तीची समस्या नसून ती कुटुंब आणि समाजाच्या भवितव्याशी निगडित बाब आहे. त्यामुळे युवकांना या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. आई-वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी ठेवलेला विश्वास व केलेली गुंतवणूक सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने जबाबदारीने वाटचाल करावी, असे आवाहन राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी केले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७: ८४ धार्मिक संस्थांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण; पडताळणी प्रक्रियेला प्रारंभ

विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. ऐनपुरे म्हणाले की, नशामुक्त भारत, विकसित भारत हा प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून साकार होणारा संकल्प आहे. युवकांनी निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त राहण्यासाठी व्यसनाला नकार देत निरोगी सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार श्री. हिरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयामार्फत नशामुक्त भारत, विकसित भारत या उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा, अमली पदार्थ घोषवाक्य व रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा राज्यमंत्री डॉ. भोयर व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस निरीक्षक श्रीमती पाटील यांनी अमली पदार्थांचे प्रकार, त्यांचे सेवन करण्याच्या पद्धती तसेच त्याचे मानवी आरोग्यावर होणारे सामाजिक, आर्थिक व शारीरिक दुष्परिणाम तसेच अमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी करावयाचे प्रयत्न याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790