नाशिक: पर्यावरणपुरक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे- मंत्री पंकजा मुंडे

नाशिक। दि. १९ ऑगस्ट २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासाठी देश- विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतील. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासह स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन संदर्भात आज सकाळी महानगरपालिकेत बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, नदी प्रदूषणबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिक पुढे येत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत गोदावरी, नंदिनीसह विविध नद्या स्वच्छ, प्रदूषणरहित आणि बारमाही प्रवाहित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी सांडपाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अनैतिक संबंधात अडधळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने केली हत्या; मृतदेह कसारा घाटात फेकला

कोणत्याही प्रकारे सांडपाणी थेट नदी पात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. मलनि:स्सारण, जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. प्रकल्पांची क्षमता वाढवितानाच तंत्रज्ञानाचाही वापर करून घ्यावा. तसेच शुद्ध केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराचेही नियोजन करावे. ही सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग वाढवावा. भाविकांसाठी आवश्यक स्वच्छतागृहांच्या उपलब्धतेचे आतापासूनच नियोजन करावे. कुंभमेळा कालावधीत घनकचऱ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. यासाठी पर्यावरण विभागातर्फे आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेत 79.82 टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह यांनी कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नदी स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम सुरू आहे. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम नागरिकांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. आयुक्त श्रीमती खत्री यांनी सांडपाणी व्यवस्थापनाबाबत महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सेवा निवृत्तीवेतनधारकांसाठी महा उपलब्धी मोबाईल ॲप- सहसंचालक बाबूलाल पाटील यांची माहिती

यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, विभागीय उपायुक्त विठ्ठल सोनवणे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790