नाशिक। दि. १९ ऑगस्ट २०२६: सर्व कोशागार कार्यालयांमधून राज्य शासकीय निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महा उपलब्धी (Maha- UPLABDHI) या मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लेखा व कोशागारे, नाशिक विभाग, नाशिकचे सहसंचालक बाबूलाल पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध माहिती व सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडून “Maha-UPLABDHI” हे मोबाईल अॅप १ जुलै २०२६ पासून कार्यान्वित केले आहे. या अॅपची मूळ उद्दिष्टे माहिती त्वरीत, अचूक व पारदर्शक स्वरुपात उपलब्ध करुन देणे, कोषागार कार्यालयांवरील निवृत्तीवेतनधारकांची प्रत्यक्ष भेटींची आवश्यकता कमी करणे, सुलभ, वापरण्यास सोपी व सुरक्षित डिजिटल प्रणाली उलब्ध करुन देणे व निवृत्तीवेतन विषयक माहिती वेळेवर उपलब्ध करुन देणे ही आहेत.
“Maha-UPLABDHI” अॅप Android व iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या अॅपमध्ये पहिल्या टप्प्यात निवृत्तीवेतन प्रदान तपशील, उत्पनाचे प्रमाणपत्र, e-PPO लायब्ररी, फॉर्म १६, निवृत्तीवेतनासंबंधी शासन निर्णय, नवीन घोषणा इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच नजीकच्या काळात लवकरच व्दितीय टप्प्यात डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Online Life Certificate) व ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्यूल या सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
मोबाईल अॅपबाबत विस्तृत माहितीपत्रक महाराष्ट्र शासनाचे “निवृत्तीवेतनवाहिनी” या प्रणालीवर उपलब्ध आहे. तसेच मोबाईल अॅपच्या Login Page वर देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांनी / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी “Maha-UPLABDHI” अॅपचा लाभ घेण्याचे आवाहन सहसंचालक श्री. पाटील यांनी केले आहे.
![]()


