नाशिक। दि. १३ ऑगस्ट २०२६: श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार आणि शनिवारी पंचवटी परिसरातील श्री कपालेश्वर मंदिर, रामकुंड आणि गोदाकाठ परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांनीही या दिवशी गोदाकाठ परिसरात वाहनांचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रावण महिन्यात सोमवारी आणि शनिवारी रामकुंड परिसरात स्नान तसेच देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघाताची शक्यता निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे.
पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी बुधवारी (दि. १२) यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. त्यानुसार, श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि शनिवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ढिकले सार्वजनिक वाचनालय, मालेगाव स्टॅण्ड, खांदवे सभागृह आणि सरदार चौक या भागातून रामकुंड-कपालेश्वर मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
दरम्यान, पोलिस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना या वाहतूक निर्बंधातून वगळण्यात आले आहे. भाविकांनी तसेच नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()


