नाशिक। दि. १० ऑगस्ट २०२६: देवळाली कॅम्प येथील ‘झेड’ (Z) सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या तोफखाना सरावांतर्गत जिवंत दारुगोळ्याचा वापर करून तोफखान्याची व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके 21 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांच्या महसुली हद्दीतील भाग तोफांच्या मार्गाच्या क्षेत्रातील धोकाक्षेत्र (Danger Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. नागरिकांनी या क्षेत्रात प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
जनरल स्टाफ ऑफिसर, मुख्यालय तोफखाना (स्कूल ऑफ आर्टिलरी), देवळाली कॅम्प यांच्या अधिसूचनेनुसार 21ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिवंत दारुगोळ्याचा वापर करून तोफखान्याची व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके (Field Firing and Artillery Practice) केली जाणार आहेत. या गोळीबारामुळे नाशिक तालुक्यातील वंजारवाडी (9016), लहवित रेल्वे स्टेशन (9316) व लोसींग हा विशिष्ट भाग धोक्याचा आहे. तसेच इगतपुरी तालुक्यातील घोटीची वाडी (9010), घोटी खुर्द (8811), नांदगाव (8714), नांदूर वैद्य (8716), साकूर (9114), बेलगाव कुऱ्हे (8517), अस्वली रेल्वे स्टेशन (8517) व घोटी खुर्द (8911) या ठिकाणांतील विशिष्ट भाग धोकाक्षेत्रात येणार आहे.
युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना सराव अधिनियम, 1938 च्या कलम 10(2) नुसार निर्धारित दिवशी व वेळेत कोणत्याही व्यक्तीने धोकाक्षेत्रात प्रवेश करू नये, तेथे जाऊ देऊ नये तसेच पाळीव जनावरे या क्षेत्रात नेऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्यास किंवा सूचनेचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल. तसेच नियम मोडून या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर राहणार नाही, याची नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री. राजपूत यांनी कळविले आहे.
![]()


