नाशिक: राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून अत्याधुनिक भूकंप मापन केंद्र कार्यान्वित

नाशिक। दि.८ ऑगस्ट २०२६: नाशिक जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींवर अधिक प्रभावी व अचूक पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, सुरगाणा येथे अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ आधारित भूकंप मापन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या माध्यमातून मिळणारी भूकंपविषयक माहिती रिअल-टाईम स्वरूपात थेट नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठविली जाणार आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने तांत्रिक निकषांच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा (ता. सुरगाणा), हरणबारी-वडे दिगर (ता. बागलाण) आणि मालेगाव (ता. मालेगाव) या ठिकाणांची भूकंप मापन केंद्रासाठी निवड केली आहे. त्यापैकी सुरगाणा तहसील कार्यालयात आज भूकंप मापन उपकरण यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले.
हे अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ कमी तीव्रतेच्या भूकंपाचीही अचूक नोंद घेण्यास सक्षम असून, नाशिक जिल्हा व परिसरातील सूक्ष्म भूकंपीय हालचालींचा वेळेत शोध घेणे, भूकंपाचे केंद्रस्थान अचूकपणे निश्चित करणे तसेच वैज्ञानिक अभ्यासासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

याच अनुषंगाने सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातर्फे भूकंप विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कळवण-सुरगाणा), तहसीलदार सुरगाणा तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; तीव्रता ४.३ रिश्टर स्केल

यावेळी राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी छोट्या नाटिकेच्या माध्यमातून भूकंपाची निर्मिती कशी होते, याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच भूकंपाच्या वेळी घाबरून न जाता सुरक्षिततेचे नियम पाळणे, स्वतःचा बचाव करणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेणे आणि आवश्यक खबरदारी कोणती घ्यावी, याबाबत विद्यार्थी व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये भूकंपाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास, संभाव्य आपत्तीच्या वेळी योग्य प्रतिसाद देण्याची तयारी वाढण्यास आणि भूकंपासंदर्भातील जनजागृती अधिक प्रभावीपणे रुजण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील भूकंपाबाबत जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

“भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य नसले, तरी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केल्यास त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतात. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नाशिक जिल्ह्यात उभारलेली अत्याधुनिक भूकंप मापन यंत्रणा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला बळकटी देणारी ठरणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भूकंपाबाबत योग्य माहिती व सुरक्षिततेच्या सवयी रुजविणे ही काळाची गरज असून, प्रत्येक नागरिकाने आपत्तीच्या काळात घाबरून न जाता शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहावे.” -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790